देहादान (एक प्रेमकथा )


#देहादान_एक_प्रेमकथा 

कॉलेजमध्ये डॉ.रोहितचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.  अधि ष्ठाता,त्यांच्या  महान कार्याचा परिचय करून देत  होते. त्यांचे शिक्षण, त्यांनी घेतलेला विविध उपक्रमातील सहभाग हे  सगळे सांगताना ते किती उदारमतवादी आहे हे सांगत होते. ते इतके उदारमतवादी आहेत की त्यांनी आपल्या प्रिय पत्नी सुमनच्या पार्थिव शरीराची कुठलीही धार्मिक  विधी न करता देहदान केले.तिची  सगळी मालमत्ता अनाथालयाला दान केली.

सुजाता, सुमनची मैत्रीण श्रोत्यांच्यामध्ये बसली होती. तिच्या  तळपायाची आग मस्तकात गेली.
"किती खोटा वागतो हा माणूस. किती मुखवटे लावतो चेहर्‍यावर. मेल्यावर सुद्धा तिचा वापर करण्याचे सोडत नाही "

ती विचारतच घरी पोहचते.

सकाळी पेपरमध्ये डॉक्टर रोहितचा फोटोसोबत त्याच्या सत्काराची मोठी बातमी होती.ती वाचून तिला सुमनची आठवण आली.
 तिला सुमनचा चेहरा डोळ्यासमोर दिसू लागला..

सुमन अणि सुजाता सायन्स कॉलेजमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक   होत्या.सुमन दिसायला सुंदर, साधी, मनमिळाऊ मुलगी . सुमनचे  पोस्टिंग केमेस्ट्री लॅबमध्ये . तीचं काम म्हणजे केमिस्ट्री लैब मधे MSC च्या मुलांना दिलेल्या साहित्याची देखरेख ठेवणे.

बरेच दिवसापासून रोहित नावाचा मुलगा प्रैक्टिकलला गैरहजर होता. रोहित, अत्यंत हुशार मनमिळाऊ, हैंडसम होता. तो बर्‍याच दिवसापासून गैरहजर असल्यामुळे तिला फार काळजी वाटत होती. परीक्षा जवळ आली असताना हा मुलगा का बर येत नसेल असा विचार तिच्या मनात आला.  तिने त्याच्या मित्राकडे चौकशी केली. मित्रांना पण काही माहिती नव्हती.तो होस्टेलवर आहे पण कॉलेज मध्ये का येत नाही याची कुणालाही कल्पना नव्हती. तिने त्याच्या मित्रांकडून  हॉस्टेलचा  पत्ता घेतलाआणि अचानक  ती त्याला भेटायला गेली... दार उघडताच तो म्हणाला... 

मैडम तुम्ही...

"अरे खूप दिवस झाले तू आला नाहीस. म्हंटल आजारी वगैरे पडलास की काय"

"नाही मॅडम, आजारी वगैरे काही नाही.  असच काही खाजगी प्रॉब्लेम आहे" तो खाली मान घालून बोलत होता....

"मग कॉलेज मध्ये का बर येत नाही.बोल ना काय प्रॉब्लेम आहे. अरे आता फायनल प्रॅक्टिकल सुरु होईल आणि तू असा गैरहजर राहिलास तर तुझं वर्ष वाया जाईल. काय प्रॉब्लेम आहे सांग मला"

"जाऊ द्या मॅडम... "

"अरे, जाऊ द्या काय म्हणतोस. तुला कळतंय?  तू काय करतोस. तू एक हुशार विद्यार्थी आहेस.तुझं वर्ष वाया जाईल. सांग मला काय अडचण आहे. मी नक्की मदत करेल "

"मैडम, माझी फी बाकी आहे.जोपर्यंत फी भरत नाही तोपर्यंत कॉलेजला यायचे नाही असं पत्र आले.मी प्रिन्सिपॉलशी बोललो पण ते म्हणाले की मी माझ्या अधिकारात तुला खुप वेळ दिला. आता जास्त वेळ देणे  शक्य नाही. घरी फोन करायची पण हिम्मत नाही कारण आलेल्या गारपिटीमुळे सगळं पीक उध्वस्त झालंय त्यामुळे घरून पैसे मिळणे शक्य नाही. मी काहीतरी काम शोधतोय. काल एका ठिकाणी मुलाखत देऊन आलोय. सिलेक्शन झालंय. दुपारी कॉलेज सुटल्यावर 3ते 7 नोकरी करायची आहे "

"अरे एवढेच ना.मी भरते तुझी फी. नंतर माझे पैसे परत करशील.
आता परीक्षेच्या दिवसात नोकरी केली तर तुझ्या अभ्यासावर विपरीत परिणाम होईल"

"अहो पण मैडम....."

"पण नाही आणि परंतु नाही. उद्या पासून कॉलेजला यायच...सुमन त्याला जवळ जवळ आदेशच देऊन गेली"

अशाप्रकारे ती आता रोहितला मदत करू लागली. सुमन अणि रोहित जवळपास सारख्याच वयाचे होते. सुमन BSC होऊन लगेच नोकरीवर लागली होती. आता सुमन त्याला जेव्हा लागेल तेव्हा पैशाची मदत करू लागली. तो ही तिच्याशी आपुलकीने वागायचा.ती नेहमी त्याच्या होस्टेलवर जायची. 

तो असाच एकदा कॉलेजमध्ये येत नव्हता.सुमनला काळजी वाटू लागली. ती लंच टाइममधे त्याला भेटायला त्याच्या हॉस्टेलवर जाते . दार लोटलेलंच होतं. ती आतमध्ये जाते . तो झोपून असतो.

"अरे काय झालं? आज कॉलेजला नाही आलास?"

"मॅडम, थोडं डोकं दुखतं थोडं"

सुमन त्याचा त्याच्या डोक्यावर हात लावून म्हणते, ":तुझं अंग गरम आहे. तुला तापही आहे थोडा.कळवायचं ना कुणाकडून.थांब मी बघते माझ्याकडे गोळी आहे का?

ती पर्समधून गोळी काढते, ही गोळी घे आधी थोडं खाऊन घे आणि पांघरून घेऊन झोपून रहा.

मॅडम, तुम्ही काय जेवाल?तुमचा डबा तर मलाच दिलात.

अरे मी घरी जाऊन खाईन नाहीतर कॅन्टीनमध्ये खाईल.


पांघरून घातलाना त्याचा अस्पष्ट स्पर्श त्याला होतो.तो उठून बसतो  आणि तिचा हात दोन्ही हातात घेत अश्रूभरल्या डोळ्याने म्हणाला," मॅडम....,"

"अरे,रोहीत असा काय करतोस?रडतोस का? काही त्रास होतो का तुला?त्याचे अश्रू पुसत सुमन म्हणाली.

"मॅडम, तुम्ही नसत्या तर माझं काय झालं असतं?"रडत रोहीत म्हणतो.
थोडं थांबून म्हणतो," मॅडम एक गोष्ट बोलू? गैरसमज करुन घेऊ नका"

"अरे काय रोहीत? बोल ना?"

"मॅडम.. मी तुमच्या प्रेमात पडलोय.एक दिवस जरी आपली भेट नाही झाली तरी अस्वस्थ होतो मी"

"रोहीत माझीही तीच अवस्था आहे..आणि आता मॅडम नाही बर..असं म्हणतं त्याच्या मिठीत शिरते "
 
ओके मॅडम

ऑ......

ओके सुमन...

अशाप्रकारे  दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले कळलंच  नाही. तो MSC चांगल्या मार्कांनी पास झाला.त्याच्यापेक्षा सुमनलाच खुप आनंद झाला. त्याच्या घरची परिस्थिती खूप हलाखीची होती. तो म्हणायचा आता नोकरी शोधावी लागेल.

"नाही रोहित " तू सध्या नोकरी नाही करायची. तू खुप  शिकायचं. तू प्राध्यापक हो. मला तुला खूप मोठ झालेल बघायचे आहे. तू PhD कर. पैशाची काळजी करू नकोस "

"अग, माझ्या शिक्षणाचा खर्च तू करशील परंतु माझ्या आईबाबांचं काय. ते माझ्या नोकरीची आस लावून बसलेत. मला आईबाबांचे पण बघावे लागेल"

"तु काही काळजी करू नको. तू फक्त अभ्यास कर. मी तूझ्या आईबाबांना पण मदत करेल. तुझे आईबाबा माझे आईबाबा समजेल.सुमन त्याला आश्वस्त करीत म्हणाली "

रोहितने  एका मोठ्या इंस्टीट्यूटमध्ये पीएचडीला प्रवेश घेतला.  त्याला विद्यावेतन  मिळायच पण पुस्तके, राहणे, सगळा खर्च त्यात भागत नव्हता. मग सुमन त्याला मदत करायची. मुख्य म्हणजे त्याच्या घरीही  ती मदत करायची.त्याचे आईवडील गरीब अणि साधी माणसे होती.त्यांना सुमनच्या मदतीची जाणीव होती आणि त्यांना त्यांचं प्रेम मान्यही होत. सुमनच्या आई वडिलांना मात्र त्यांचं प्रेम आणि कुण्या दुसऱ्या माणसांवर सुमनचे पैसे खर्च करणे पटत नव्हते त्यातल्या त्यात तो वेगळा समाजातील होता म्हणुन त्यांचा सुमनच्या लग्नाला विरोध होता...

सुजाता पण समजवायची,  किती मदत करशील?अगं तो तुझा फायदा घेतो.अगं तो मोठा प्राध्यापक होईल आणि तू क्लास थ्री.. अगं नंतर लाज वाटेल त्याला तुला मिरवण्याची पण सुमनचा रोहितवर खूप विश्वास होता.


रोहितचे phd सुरु होते आणि सुमनचे लग्नाचे वय झाले होते. 

'रोहित, आपण आता लग्न करायला हवं..... "

"अग, पण माझं phd व्हयला वेळ आहे... "

"अरे,तू तुझं शिक्षण कर ना आरामात. मी कुठे मध्ये येते त्यांच्या. फक्त आपण लग्न करू या म्हणजे माझे आई वडील जे माझ्या लग्नाच्या मागे लागले त्यांची भुणभुण दूर होईल "

रोहितला ही ते पटले. नाही म्हटलं तरी त्याला त्याच्या आईवडिलांची काळजी राहायची. एकदा लग्न झाले की एक सून म्हणुन त्यांच्या आईवडिलांची जबाबदारी आपोआप सुमनची होईल आणि आपण निर्धास्तपणे आपलं स्वप्न पूर्ण करू शकू. 

दोघांनी लग्न केले. सुमनच्या आई आईवडिलांचा लग्नाला विरोध होता त्यामुळे सुमनच्या आईवडिलांनी सुमनशी संबंध तोडले. आता तर रोहित अणि त्याच्या आईवडीलांची जबाबदारी तिची झाली होती.तिच्या तुटपुंज्या पगारात ती सर्व आनंदाने करायची. आपल्या इच्छा बाजूला ठेवून त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती झटत होती.

रोहित ची PhD पूर्ण झाली अणि मोठ्या यूनिवर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणुन रुजू झाला. सुमनला खूप आनंद झाला. सुमन अणि रोहित वेगवेगळ्या शहरात राहू लागले. कधी उन्हाळ्याच्या सुट्टीत सुमन त्याच्या कडे जायची तर कधी रोहित सुमनकडे  यायचा.दोघेही खूप आनंदी होते.दोन तीन वर्षे आनंदात गेली.

तीला आता असं वेगळं वेगळं राहायचा कंटाळा आला होता. 

ती म्हणायची, "रोहित तू इकडे नोकरीचे बघ ना.अरे मला आता एकट राहायचा कंटाळा आलाय"

"हो... बघू या,पुढच्या वर्षी प्रयत्न करतो.  अस म्हणुन टाळायचा"

ती म्हणायची, " मी नोकरी सोडून तुझ्याकडे येते.तसाही तुझा भरपूर पगार आहे.  अस किती दिवस आपण वेगळे रहायचे"

"अग, काही दिवस थांब. मी प्रयत्न करतो"

अस करता करता दहा वर्ष झाली.पण त्यानी इकडे नोकरी शोधली नाही किंवा सुमनला नोकरी सोडायला सांगून सोबत नेले नाही. 

आता रोहितचे येणे पण कमी झाले होते.

ती म्हणायची,"तुला नाही जमत तर  मी येतेना या उन्हाळ्यात"

"अग माझ दुसर्‍या शहरात लेक्चर आहे  किंवा माझी कॉन्फरन्स आहे त्यामुळे मी बाहेरगावी जात आहे. तेव्हा तू येवून काय करशील"असं म्हणुन तो टाळायचा.

"आपलं स्वतःच घर घेतल्यावर जाऊ. मी फ्लॅट बुक केला. थोडे पैसे देना"असं प्रेमाने वागून तिच्याकडून पैसे नेत होता.

आता सुमन उदास राहत होती.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या.ती फोन लावायची तर लागत नव्हता.आता तिनी ठरविले की आपणच जायचं आणि रोहितला सरप्राईज द्यायचं . त्याला न कळविता ती त्याच्याकडे गेली.गेट उघडून आत मध्ये गेली. अंगणात तीन चार वर्षाच मूल खेळत होत. तिला ते एकदम ओळखीचे वाटू लागले.त्याचे डोळे एकदम रोहित सारखे दिसत होते. तिला तिच्या कल्पनेचे हसू आले.डोळे तर कुणाचे पण कुणा सारखे असू शकतात.ती आत आली.डोअर  बेल वाजवली. एका स्त्री नी दरवाजा उघडला....

"कोण पाहिजे....."

"डॉ. रोहित.  ईथेच राहतात ना?"

हो.. . 

"तुम्ही कोण ? "

"मी त्यांची पत्नी. प्राध्यापक रुपाली.... तुम्ही कोण?"

सुमन ला वाटले आपण चक्कर येऊन पडतो की काय.तिनी स्वतःला सांभाळले.

"मी रोहितची मैत्रीण सु.... सुषमा. तिने मुद्दामून आपले नाव सांगितले नाही. रोहित कुठे गेला?

"कॉलेजमध्ये काही काम होत.बसा ना.येतीलच इतक्यात"

"नाही मला वेळ नाही. या रस्त्याने जायचे होते..मी दिल्लीला जाते कळल्यावर त्याच्या आईने लाडू पाठविले "तिने मुद्दामहून आपलं खरं नाव नाही सांगितलं 

"त्याची आई? त्याला आईबाबा कुणीही नाही. अनाथ आहे तो "

"हो, खरंय.त्याची सख्खी आई नाही आहे. त्याला सांभाळनारी बाई आहे ती पण ती वेडी स्वतःला त्याची आईच समजते "स्वतःच्या भावनेवर ताबा मिळवत सुमन म्हणाली.

सुमन माघारी फिरली.....

सुमन वापस आली. खुप रडली.आपण आपल सर्वस्व पणाला लावले अणि हा इतका कृतघ्न कसा निघाला. त्यानी इतके दिवस आपली फसवणूक केली.यानी आपला उपयोग घेतला. आपण काय केलं नाही याच्यासाठी. आपले आईवडील सोडले याच्या आईवडिलांना आपले आईवडील मानले. याच्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या आपण निभावल्या आणि त्याची परतफेड यानी अशी केली.... 


शेवटी ती सुजाता ला भेटली . तिच्या कुशीत खूप रडली. सुजाता  म्हणाली,  "अग तो येईपर्यंत थांबायचे ना. त्याला जाब विचारायला ना.अशी  कशी तू त्याला न भेटता आली"

"त्याने  काय झाल असते? तो मला परत मिळाला असता?अग, त्याला बायको अणि मुलगा आहे. त्यानी नक्कीच तिला पण अंधारात ठेवले असणार.अज्ञानात पण सूख असतात म्हणतात ना. तिला सुखी राहू दे. मी त्याच्यावर निस्सीम प्रेम केल अणि करत राहील.तो माझ्यावर प्रेम करीत नाही.त्यानी केवळ माझा उपयोग केला. प्रेम तर जबरदस्तीने मिळवू शकत नाही.वाईट याचे वाटते की आपण ज्याला प्रेम समजत होतो ते प्रेम नव्हतेच ग.  माणूस किती स्वार्थी असू शकतो याचं उदाहरणं असावा रोहित. 
जो माणूस आपल्या आईवडिलांना जिवंतपणी मारतो . स्वतःला अनाथ म्हणवतो तो किती लबाड असावा?सुजाता, माझं  काय चुकलं गं?" असं म्हणुन सुमन ओक्साबोक्सी रडू लागली. 

त्याने आपल्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू नये म्हणून सिमकार्ड काढून फेकले.

आता  तिने त्याला विसरायचे ठरविले. स्वतःला विविध सामाजिक कार्यात गुंतवून घेऊ लागली.ती भयानक खचली होती.अशातच तिची प्रकृती ठीक राहत नव्हती. ती त्याकडे दुर्लक्ष करीत होती.


एकदा सुजाता तीला भेटायला गेली.ती  भयंकर थकलेली आणि कृश दिसत होती.  सुजाता तिला जबरदस्तीने दवाखान्यात घेऊन गेली. सगळ्या तपासण्या झाल्या.डॉक्टर नी कर्करोगाचे निदान केले.कुणी जवळचे नातेवाईक असेल तर बोलवा म्हणुन सांगितले.

ती म्हणाली,डॉक्टर मला कुणीच नाही. फक्त ही माझी मैत्रिण आहे. तुम्ही मलाच काय ते सांगा...

डॉक्टर म्हणाले, "तुम्ही खूप उशीर केला. आजार लास्ट स्टेजमध्ये आहे.तरी काळजी करू नका.औषधशास्त्रात खूप प्रगती झाली. इच्छाशक्ती ठेवा. तुम्ही यातूनही बाहेर याल.


सुजाताला खूप रडायला येत होते. पण सुमन मात्र शांत होती.

डॉक्टर म्हणाले, "आजच भर्ती व्हावे लागेल "

"डॉक्टर मला काही गोष्टींची विल्हेवाट लावायची आहे.  मी उद्या येते भरती व्हायला "

"सुजाता, चल आपल्याला वकिलांकडे जायचं आहे"

"अग, सुमन, तुझी तब्बेत ठीक नाही आणि तुला हे काय सुचतं  ग. अग लवकरात लवकर भरती  हो"

"सुजाता, आज भरती  झाली काय आणि उद्या काय. माझं मरण अटळ आहे. त्यामुळे मला काही गोष्टीची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे"

दोघी वकिलांकडे गेल्या.  लगेच तिनी वकीलपत्र करून घेतले तिची सगळी मालमत्ता एका अनाथालयाला दान केली. काही रक्कम गरजू मुलांच्या शिक्षणासाठी कॉलेजला  देणगी दिली .

ती म्हणाली, "एखादा तरी मुलगा कृतज्ञ निघेल. ज्याला मी केलेल्या मदतीची जाणीव राहील "

दोघी दवाखान्यात आल्या.   तिने देहदानाची चौकशी केली अणि देहदानाचा फॉर्म  भरून घेतला.

अगं, देहादान का करतेस?

" जिवंतपणी त्यानी बायको म्हणुन कुठलीच जबाबदारी पार पाडली नाही.  तेव्हा मेल्यावर माझ्या अंत्यसंस्काराची जबाबदारी पण त्याच्यावर नको. माझ्या आजाराबद्दल त्याला कळवायचे नाही. त्याला पाहिले की कदाचित  आजाराशी लढताना कमजोर पडेल. गेल्यावरच कळव."

सगळं आटोपून सुमन  दवाखान्यात भरती झाली.

आजार इतका वाढला होता कि विशेष काही करण्यासारखे नव्हते.तिला खूप त्रास होत असावा. परंतु ती दाखवित नव्हती  अणि एकदिवस शांतपणे ती गेली.

सुजातानी रोहितला फोन केला.त्याला धक्काच बसला.इतकं सगळं झालं आणि मला का नाही कळविले म्हणुन चिडला. 

तू येतोस ना?सुजाता शांतपणे म्हणाली.. 

हो, लगेच निघतो..... 

दोन चार तासात रोहित पोहचला.. 

अग, सुजाता असं अचानक कस झालं... 

अचानक नाही.. तीला कॅन्सर होता... 

काय..... मग मला आधी कळवायचं ना... 

सुमन  नाही म्हणाली होती.तिने सांगितले होते की मी गेल्यावर कळवा 

सुजाता नी विचारल, एकटाच आला? 

तो आश्चर्यकारक रित्या पाहू लागला... 

अरे तुझी बायको नाही आली......

तुला कस माहिती..... तो अडखळत बोलला. 

सुजाता नी त्याला सुमन त्याच्याकडे आल्यापासून ची सगळी घटना सांगितली. दोन थेंब त्याच्या डोळ्यातून पडले.

चला,  क्रियाकर्माच बघू या... रोहित म्हणाला .

त्याची काही गरज  नाही. तिनी देहदान केले आहे. तू जिच्यामुळे या पदावर आहे तीच अंतिम दर्शन घ्यावं म्हणुन तुला कळविले. 

सुजाताने तिचा देह हॉस्पिटल प्रशासनाच्या स्वाधीन केला. देहदानाच्या फॉर्मवर  नवरा म्हणुन रोहितने सही केली.

रोहीत, तू फक्त सुमनाचा जीवनसाथी म्हणून दोन गोष्टी केल्या. एक मॅरेजसर्टिफिकेटवर सही आणि आता देहदनाच्या फॉर्मवार सही. त्याशिवाय तू एकही नवऱ्याचं कर्तव्य निभावलं नाहीस.सुजाता रडतच म्हणाली.
                              

अगं, किती वेळ पेपर घेऊन बसलीस, मुलीच्या आवजाने  सुजाता भानावर आली.


©अर्चना अनंत धवड 

Comments