सोशल डिस्टंसिंग सोसेना

आज राहुल येणार म्हणून मानसी खूप आनंदी होती. जवळपास पाच महिन्याने  राहुल येणार होता. कधी एकदा ऑफिस संपते आणि कधी एकदा घरी जाते असं झालं होत तिला. एकदाचे पाच वाजले आणि ऑफिस सुटलं..

तिने गाडी काढली.गाडी चालवताना  विचार करू लागली ,'किती दिवस झाले ना?मार्च मध्ये गेला आणि लॉकडाऊन  झालं .अडकूनच पडला , येताच आलं नाही .विचारानेच डोळ्यात पाणी आलं . डोळ्यातील अश्रू पुसत गाडी चालवू लागली .

मानसी दवाखान्यात डॉक्टर म्हणून काम करायची आणि राहुल पोलीस इन्स्पेक्टर .दुसऱ्या शहरात त्याची अलीकडेच बदली झाली होती .दर शनिवारी रविवारी घरी यायचा .अचानक कोरोना आला आणि त्यांच येणंच बंद झालं  .पोलीस विभागाची जबादारी बघता त्याला सुट्या मिळेना आणि लॉकडाऊन मुळे वाहतूक व्यवस्था बंद त्यामुळेही येता  येईना .एकदाची बस सेवा सुरू झाली आणि आज चक्क पाच महिन्याने घरी येणार होता.

गाडी चालवताना मानसीने घड्याळात पाहिले .साडेपाच वाजले, आला असेल राहुल असा विचार करून तिने गाडीचा वेग वाढविला.

घरी आली तर राहुल तिचीच वाट पाहत होता.घरी पोहचताच ती आधी सरळ बाथरूम मध्ये गेली . कोरोना आल्यापासून हॉस्पिटल मधून येताच डायरेक्ट बाथरूम हेच ठरलं होतं.

आज बऱ्याच दिवसाने राहुल येणार म्हणून तिने तिच्या आठ वर्षाच्या मुलाला सकाळीच आईकडे पोहचवून दिले होते .
आई  म्हणाली होती ,अग इतक्या दिवसाने राहुल येतोय .त्याला भेटू दे की मुलाला.

"अग, आई आम्हाला शॉपिंगला जायचं आहे .रात्री उशिर होईल .राहू दे त्याला आजच्या दिवस .उद्या सकाळी घेऊन जाईल ".

दारातून वहिनी म्हणाली, आई राहू द्या त्याला ,खेळेल आपल्या रुद्रसोबत .ताई शॉपिंगला चालल्या, पाच महिन्यानंतर भाऊजी येतायत ना आणि हळूच मानसीला डोळा मारला.मानसीने वाहिनीवर डोळे काढले .आंघोळ  करताना सगळं आठवलं आणि उगीचच मनात हसली .ही वहिनी पण भारी चावट आहे. बर झालं आईला काही कळलं नाही .

मानसी अंघोळ करून आली. राहुल तिच्याकडे पाहतच राहिला . तिचे ओले केस चेहऱ्यावर आले होते .तो तिच्या जवळ जाऊन चेहऱ्यावरील बटा बाजूला करायला म्हणून हात पुढे करताच  तिने मानेला झटका देऊन केसातील पाण्याचे तुषार त्याच्या अंगावर उडविले आणि सरळ चहा करायला किचनकडे वळली . तो तिच्या त्या पुसटशा स्पर्शाने बेधुंद झाला.

"अग ,चहा राहू दे.मला नको चहा , तिला स्वतः कडे ओढत राहुल विनवत म्हणाला.

त्याला हळूच ढकलून मानसी किचनमध्ये गेली. "अरे तुला नको असेल पण मला हवाय चहा.अरे थांब जरा  ,किती ही अधीरता .मी पटकन चहा करते .बघ मी वेदला आईकडे पाठविलं .आज आपण दोघेच  राजा राणी "डोळा मारीत मानसी म्हणाली .

ती चहा करता करता गोष्टी करू लागली .

"अरे, ती मधू माहिती आहे ना माझी मैत्रीण, ती कोरोना पॉझीटीव्ह आली आज ...खूप टेन्शन आलंय सगळ्यांना".

"ती मधू, तूझ्या डिपार्टमेंट मध्ये आहे ती? आपण तिच्या लग्नाला गेलो होतो ती? राहुलने काळजीने वीचारले.

"हो रे तीच. आता आठ महिन्याचं बाळ आहे तिला. मला तर खूप काळजी वाटते".

गप्पा करता करता दोघांनी चहा घेतला .

राहुलनी टीव्ही लावला आणि बातम्या पाहू लागला.

"का रे  ?तू  टीव्ही पाहतोस ? घाई  होती ना तुला" डोळा मारत मानसी म्हणाली.

"अगं भूक लागली. स्वयंपाक कर लवकर. लवकर जेवून घेऊ "

"हो तेही खरं, सात वाजत आहे .पटकन स्वयंपाक करते. जेवण झाले की मग पूर्ण वेळ आपलाच  "तिरपा कटाक्ष टाकत मानसी म्हणाली.

मानसीने कुकर लावला. भाजी करायला कांदे टोमॅटो कापायला घेतले.स्वयंपाक घरातील कामं करता करता मनात विचार करू लागली, या राहुलला अचानक झालं तरी काय? आठ दिवसांनी यायचा तरी किती अधीर असायचा. अगदी स्वयंपाक घरात सुद्धा मध्ये मध्ये करून मला स्पर्श करण्यासाठी बहाणे शोधायचा. मला मिठीत घ्यायला अगदी आसूसलेला असायचा आणि आज पाच महिन्यांनी येऊनही असा का वागतो ? मघा तर किती उतावळा झाला होता आणि आता एकदम शांत कसा झाला ?प्रवासाने थकला असेल कदाचित .कुकरच्या शिट्टीने  तीच्या विचारांची शृंखला तुटली .

स्वयंपाक झाला तिने जेवायला घेतलं .दोघांचे जेवण झाले
तो परत टीव्ही पाहायला बसला .

हा असा का वागतो या विचारातच तिने किचन आवरले आणि मी जाते झोपायला  असं सांगून मानसी बेडरूम मध्ये गेली .

मानसीने फ्लॉवरपॉटमधील फुलं बदलली .रूम फ्रेशनर फवारला.छान तयार झाली .अंगात छान नाईट गाऊन घातला .खांद्यावर रुळणारे केस मोकळे सोडले.राहुलचे आवडते अत्तर  लावले आणि त्याची वाट पाहत मॅगझीन वाचू लागली .

थोडया वेळाने राहुल आला आणि उशीला टेकून बसून मोबाईल पाहू लागला .

मानसी विचार करू लागली याला झालं तरी काय ?काय रे तुझी तब्बेत ठीक नाही का ?त्याच्या जवळ सरकत मानसी म्हणाली.
तीच्या गंधाने तो मोहरला पण स्वतः ला सावरत थोडं अंग चोरून म्हणाला तसं नाही ग ,तू म्हणालीस ना तुझी मैत्रीण मधू पॉझिटिव्ह आली .तुला पण इन्फेक्शन झालं असेल तर ?हळूच अडखळत राहुल म्हणाला.

मानसीला खूप हसायला येत होतं पण आपलं हसू दाबत म्हणाली ,हो का ?तरी मी म्हटलं इतका संयम कुठून आला. कोरोनाने संयमी बनवलं बाबा तुला .... ठीक आहे तुला भीती वाटले ना कोरोनाची ? तू झोप आता ..त्याच्या खांद्यावर थोपटत मानसी म्हणाली .

तिचा स्पर्श होताच वीज चमकावी तस काहीतरी त्याच्या सर्वांगात झालं ...

तो उठून उभा झाला ...

अरे लाईट बंद करतोस का? ठीक आहे कर. मी पण झोपते ,हातातील मॅगझीन साइड टेबलवर ठेवीत मानसी म्हणाली .

अरे, हा कपटाकडे कडे कुठे चालला , मानसी मनात म्हणाली.

राहुलनी कपाटातून दोन मास्क काढले .एक स्वतः लावला आणि एक हातात घेऊन  मानसीच्या दिशेने आला .

"अरे ,हे काय ? हे वाक्य तोंडातच असताना तिला मास्क लावला आणि स्वतःकडे ओढलं ..तीही त्याच्या स्पर्शाने मोहरली आणि त्याला अलगद बिलगली ..हळूहळू त्याला मास्कची अडचण होऊ लागली आणि हळूच त्याने दोघांचेही मास्क भिरकावून दिले ..

अरे हे काय तुला कोरोनाची भीती वाटते ना हे तिचं  वाक्य पूर्ण होण्याआधी त्याच्या ओठाने  तिला बोलण्याची संधीच दिली नाही .
दोघेही भान हरपून एकमेकात हरवून गेले.

आवेश उतरताच दोघेही शांतपणे झोपी गेले.

पहाटे कसल्याश्या आवाजाने मानसीला जाग आली ...पाहते तर राहुल स्टीमरनी वाफ घेत होता.

ते पाहून मानसी घाबरलीच.

"का रे ,बर नाही का तुला ? घसा खवखवतो का? खोकला झाला का?ताप आहे का?"काळजीने मानसी विचारू लागली.

नाही अग, रात्री "जोश मे होश खो बैठे"पण जर तुला इन्फेक्शन झालं असेल तर ? मधू आणि तू सोबत काम करतेस ना?अडखळत राहुल म्हणाला.

मानसी मात्र जोरजोरात हसू लागली .

अग, हसतेस का?तुला भीती नाही वाटत?

अरे ,ती पॉझिटिव्ह आली पण तिचा आणि माझा काय संबंध  ?
अरे दोन महिन्यांपूर्वी तिची ड्युटी कोरोना वॉर्डमध्ये लागली .ती आता  माझ्यासोबत काम करीत नाही . माझी तिची भेटच नाही दोन महिन्यात. अरे व्हाट्सअप्प ग्रुपवर कळलं आज तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणून .

हे आधी नाही का सांगायचं?किती घाबरलो  मी ? राहुल चक्क ओरडलाच.

" अरे पण मी फक्त एवढंच सांगितलं की मधू पॉझिटिव्ह  आली.बाकी मी काहीच बोलले नाही " मधू हसत म्हणाली.

"किती दृष्ट आहेस ग तू?किती घाबरवले मला ...याची शिक्षा तुला मिळायालाच हवी अस म्हणून तो तिच्या मागे धावला ...  पळापळीत त्याने तिला मिठीत घट्ट पकडले ...

"अरे "पण कोरोना..."

तिच्या ओठावर बोट ठेवीत तिला आणखी जवळ ओढीत म्हणाला ,या कोरोनाची तर ऐसी की  तैसी ...तीही हसत त्याच्या मिठीत शिरली ...दोघेही एकमेकात हरवून गेले...

©अर्चना अनंत✍️

Comments