दोन किनारे (भाग -5)

                                           ५
सौरभ सकाळी लवकर  उठला .पटापट तयारी केली .कॅब बुक करायला म्हणून मोबाईल हाती घेतला . पाहतो तर मानसीचा मेसेज  ."मला भेटल्याशिवाय जाऊ नकोस मी येते सकाळी भेटायला "

साडेपाच वाजले होते.. कॅब बुक करावी तोपर्यत येईलच मानसी असा विचार करुन  त्याने कॅब बुक केली तेवढ्यात बेल वाजली.
सौरभ ने दार उघडलं... समोर मानसी उभी  होती.. मानसी आत येताच सौरभच्या गळ्यात पडून हमसाहमशी रडू लागली.

सौरभने तिला मनसोक्त रडू दिले... तो फक्त तिच्या डोक्यावरून हात फिरवीत होता.

तिला हात धरून खुर्चीवर बसविले... "शांत हो मानसी. का रडतेस? अगं तुझा माझ्यावर विश्वास नाही का? "

"आहे ना, कदाचित स्वतः वर जेवढा नाही त्यापेक्षा जास्त तुझ्यावर आहे.. पण नशिबावर नाही. परिस्थितीवर नाही. मला फार भीती वाटते रे "

"अगं, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना.. मग बस "

"अचानक इतक्या  गोष्टी  माहिती पडल्या की मला भीतीच वाटायला लागली. तुझे आईबाबा आपलं नातं स्वीकारतील याची मला खात्री वाटत नाही. तुझ्यावर माझा विश्वास आहे पण तुझ्या आईबाबांनी नाही म्हटलं तर.... तू जरी लग्नाला तयार असला तरी आईबाबांच्या मर्जीविरुद्ध लग्नाला माझी आई तयार नाही.. त्यामुळे आपल्या नात्याचं भविष्य फार अधांतरी वाटतं मला "

"हे बघ तुझा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा माझ्या आईबाबांवर... तू फक्त देवावर विश्वास ठेव.. आता हस बघू. तू अशी रडत मला निरोप देणार? तिचे डोळे पुसत सौरभ म्हणाला.

"सौरभ एक लक्षात ठेव.. मी तुझ्यावर प्रेम केलंय. पाहिलं आणि शेवटचं प्रेम असणार माझं.. तू नेहमी हे लक्षात ठेवशील की मी तुझी वाट पाहत असेल अगदी शेवटच्या श्वासा पर्यंत... मला कृष्णाची रुक्मिणी होता नाही आलं तरी राधा होऊन राहील शेवटपर्यंत... तिने पर्समधून छोटीसी कृष्णाची मूर्ती काढली आणि त्याच्या हातात दिली... ही मूर्ती अशा ठिकाणी ठेवशील जिथे तुझ्या नेहमी नजरेत पडेल आणि तुला आठवण यावी की कुणीतरी तुझी वाट पाहतं. आता ती वाट पाहणारी राधा की रुक्मिणी हे तू ठरवायचं "

"अगं अगं.. काय तत्वज्ञान लावतेस.. काय राधा आणि काय रुक्मिणी... तू मानसी आणि मी सौरभ हे पुरेसं आहे मला... आणि आपलं दोघांचं लग्न होणार आहे... बस.. आणखी काही मला माहिती नाही आणि काय ग, रुक्मिणी करायला तर मी आताही तयार आहे मॅडम.. पण तुम्ही रुक्मिणी सारखं पळून यायला तयार आहात काय? "सौरभ हसत म्हणाला.

तुला चेष्टा सुचते? उगीच खोटं खोटं मारीत मानसी म्हणाली.

तेवढ्यात कॅब आली .एकदा घट्ट मिठी मारून मानसी बाजूला झाली .

दोघे सामान घेऊन बाहेरआले ..घराला कुलूप लावून तो कॅब मध्ये सामान ठेवू लागला ..मानसी त्याला मदत करू लागली ...

कॅबमध्ये बसताना त्याने हलकाच तिचा हात दाबून आश्वस्त केले ...डोळ्यातील अश्रू डोळ्यातच रोखत मानसीने त्याला हळव्या मनाने निरोप दिला.

कॅब विमानतळाच्या दिशेने निघाली होती .

सौरभने मानसीची समजूत जरी काढली तरी थोडी भीती त्यालाही वाटली मनात .मानसी म्हणते तसं खरंच आईबाबा विरोध करतील ?का करतील विरोध ?त्यांचाही तर प्रेमविवाहच तर आहे त्यातल्या त्यात आंतरजातीय ...मग मला का करतील विरोध ?

त्याला एकदम मानसीकडील ती फोटोफ्रेम आठवली .त्या तिघीतील एक होती नॅन्सी फ्रांसिस ....नॅन्सी फ्रांसिस म्हणजे माझी आई ...आताची नॅन्सी इमानदार ...

पण आई आणि नर्स ?आई कधीच कसं बोलली नाही ?
त्याला त्याची आई आठवली .

लहानपणापासून त्याला आठवत असलेली आई म्हणजे त्यांच्या हॉस्पिटलची अडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर .सगळ्या हॉस्पिटलचा कारभार समर्थपणे सांभाळणारी ...बाबा क्लीनिकल बाजू सांभाळणार आणि आई प्रशासकीय ...सगळ्या कर्मचाऱ्यांवर एक वेगळाच वचक ....कुण्या कर्मचाऱ्याने कामचुकारपणा केला की त्यांना धमकी मिळायची ,करू का तुला मॅडमसामोर उभं ?म्हणजे बाबांपेक्षा आईचाच दरारा अधिक ..त्यामानाने बाबा शांत ..कुणाला रागावणार नाही की ओरडणार नाही .आई नेहमी म्हणायची की असं वागल्यानी लोकं ऐकत नाही .बाबा हसून म्हणायचे ते डिपार्टमेंट तुझ्याकडे ...

आईची स्वतंत्र केबिन होती .दारावर नेमप्लेट होती .मिसेस नॅन्सी इमानदार ...MBA इन हॉस्पिटल मॅनेजमेन्ट...कुठेही नर्सिंग च्या शिक्षणाचा उल्लेख नव्हता .बोलताना कधीही चुकूनही ऐकलं नव्हतं .अनेकदा शिक्षण घेताना  फॉर्म भरताना आईच शिक्षण विचारतात पण कधीही नर्सिंग च्या शिक्षणाचा उल्लेख केल्याचं आठवत नाही .नेहमी MBA  च लिहायचो ...का अस आपलं शिक्षण लपवले असेल आईने ?का?

कारण काहीही असो पण एक छानच झालं .आई स्वतः नर्स असल्यामुळे आमच्या लग्नाला पाठिंबा नक्कीच देईल .शिवाय मानसी म्हणाली त्याप्रमाणे आई आणि मानसीची आई जर मैत्रिणी आहेत तर विरोध करायचा प्रश्नच नाही ....

विचाराच्या तंद्रीत विमानतळ कधी आलं सौरभाच्या लक्षातच आलं नाही ...कॅब मधून उतरून तो विमानतळाकडे जायला निघाला .

क्रमशः

©अर्चना अनंत धवड


Comments