दोन किनारे (भाग -3)

                                       3
     सायंकाळी पाच वाजता दोघी मायलेकी सौरभ ची वाट पाहत बसल्या होत्या .बरोबर पाच वाजता बेल वाजली .मानसी ने दार उघडलं .

उंच पुरा सौरभ दिसायला रुबाबदार होता .गोरा रंग,कुरळे केस ,किंचित भुरे डोळे ...पाहताक्षणी कुणावरही छाप पडेल असच त्याचं व्यक्तिमत्व होतं. अगदी साधं टीशर्ट आणि जीन्स घातलेला असूनही तो आकर्षक दिसत होता .

ये ,सौरभ ...बस .सोप्याकडे बोट दाखवत मानसी म्हणाली .

सौरभ ने प्रवेश करताच सभोवार नजर फिरविली . छोटासा वन बेडरूम किचन फ्लॅट ... हॉल मध्ये आटोपशीर फर्निचर ...छोटासा हॉल पण सुंदर रीतीने सजविला होता .कोपऱ्यात एक छोटा टेबल होता . त्यावर सुंदरसा फ्लॉवरपॉट  आणि त्याच्या बाजूला एक छानशी फोटोफ्रेम होती .त्यात  नर्सिंगच्या ड्रेस मधील तीन मैत्रीणीचा फोटो होता त्याला काहीतरी ओळखीचा भास झाला .जरा निरखून पाहावं म्हणून समोर जाणार तेवढ्यात मानसी म्हणाली,"बस हं!मी पाणी आणते ". आणि तो सोप्यावर बसला .

ती पाणी घेऊन आली ...त्याला आणि आईला पाणि दिलं ..

"तुम्ही बसा मी चहा करते "मानसीची आई म्हणाली .

"नको ,काकू ...तुम्ही बसा ..तसही मी चहा घेत नाही ".

थोडावेळ तिघेही शांत होते .शांतता तोडत मानसी म्हणाली ,"आई हा सौरभ ,सौरभ इनामदार  ...माझ्याच हॉस्पिटल मध्ये MD झालंय ...
मूळचा मुंबईचा "

"काकू,आमचं स्वतःच  मोठं हॉस्पिटल आहे मुबंईमध्ये .माझे बाबा कॉरडीओलॉजिस्ट आहे आणि आई अडमिनिस्ट्रेशन सांभाळते.
मानसीच आणि माझं प्रेम आहे एकमेकांवर आणि आम्हाला लग्न करायचं आहे ". सौरभ एका दमात बोलून गेला .

"तुला माहिती आहे ती एक नर्स आहे आणि तू एक डॉक्टर ...आपल्या समाजात ही सामाजिक दृष्ट्या खूप मोठी दरी समजतात  .तुला कमीपणा तर नाही येणार ?तू तिचा आत्मसन्मान जपू शकशील ?"

"मी मानसीवर प्रेम केलं .तिचा आत्मसन्मान जपणे माझे कर्तव्यच आहे ".

"ठीक आहे .पण तू तुझ्या आईबाबांना सांगितलं ?प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते आपल्या डॉक्टर मुलाला डॉक्टरच जीवनसाथी मिळायला हवी  आणि काय माहिती कदाचित तुझ्या आईबाबांनी शोधूनही ठेवली असेल एखादी डॉक्टर मुलगी ?.

"नाही,माझे आईबाबा अस करू शकत माही .त्यांनी कुठलाही निर्णय माझ्यावर कधीच लादला नाही .कधीच कुठल्याही बाबतीतीत.अगदी शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा नाही .त्यांना वाटायचं मी सर्जन व्हावं पण  मला फिजिशियन व्हायचं होतं .त्यांनी मला माझं करिअर निवडीचे पूर्ण स्वतंत्र दिले .माझ्या आनंदातच त्यांचाआनंद आहे ".

"एवढा विश्वास आहे तुला ?ठीक आहे .तू तुझ्या आईबाबांना आधी सांग .आईवडिलांच्या विरोधात जाऊन ,सगळ्या समाजाच्या विरुद्ध जाऊन लग्न केल्यास काय त्रास होतो हे माहिती आहे मला .माझ्या एका जवळच्या मैत्रिणीने भोगलंय ते आणि हो तुला ती नर्स आहे म्हणून मिरवायची लाज वाटत असेल तर आताच विचार कर .नंतर तिला नोकरी सोडायला लावणे किंवा तुला साजेसे शिक्षण घ्यायला भाग पाडणे असं व्हायला नको .तिलाच नोकरी करायची नसेल तर तो भाग वेगळा ".

मानसीची आई बोलता बोलता थांबली .एकदा सौरभकडे आणि एकदा मानसीकडे पाहिलं .सौरभ शांतपणे ऐकत होता तर मानसीला बहुतेक आपल्या आईने इतक्या अटी शर्ती सौरभसमोर ठेवलेल्या आवडले नाही .तीच्या चेहऱ्यावर एक दडपण दिसत होत .

हे बघ या सगळ्या गोष्टी नंतर बघू...पण तू आधी तुझ्या आईबाबांना तुमच्या नात्याची कल्पना दे .आणि सांग मी एका मुलीवर प्रेम करतो ,मला लग्न करायचं आहे ..ती नर्स आहे आणि एका नर्सची मुलगी आहे . आणि आणखी एक मानसी एक अविवाहित आईची मुलगी आहे ..जिचा बाप मेलेला नसून जिवंत आहे आणि एक डॉक्टर आहे .

आई....मानसी मध्येच ओरडली .

"मानसी कोणत्याही नात्याची सुरवात खरेपणाने करावी .उद्या दुसऱ्याकडून माहिती होऊन संबंध तुटण्यापेक्षा सगळं सत्य समोर ठेवून नात जोडावे मग ते जुळण्याआधी तुटले तरी चालेल "आईने तिला समजावलं.

मानसीच्या आईने डॉक्टर राजन देशमुखने कशी फसवणूक केली हे सगळं सौरभला सांगितलं .

सौरभला धक्काच बसला पण डॉक्टर राजन देशमुख हे नाव मात्र चांगलंच परिचयाच होतं.त्याच्या बाबाच्या हॉस्पिटलचे पार्टनर आणि त्याचे लहानपणापासूनचे राजन काका ..पण तो काहीच बोलला नाही .

"काकू ,माझं मानसीवर प्रेम आहे आणि मला तीच्या किंवा तुमच्या भूतकाळाशी काहीही घेणेदेणे नाही" .

"ठीक आहे एवढं सगळं ऐकून जर तुझे आईबाबा तयार असतील,त्यांनी होकार दिला तर माझी काहीही हरकत नसेल ".
त्यांना मान्य असेल तरच मी लग्नाला संमती देईल ".

"तुम्ही बसा, मी काहीतरी खायला आणते" अस म्हणून मानसीची आई किचनमध्ये गेली .

"झालं ना आता समाधान ,मला माझ्या आईबाबांवर पक्का विश्वास आहे त्यामुळे आपलं लग्न पक्क "मानसीला डोळा मारीत सौरभ म्हणाला.

हॉलमध्ये नजर टाकताच त्याचे लक्ष परत त्या कोपऱ्यातील फोटोकडे गेले .

त्यांनी फोटो हातात घेतला आणि बारकाईने पाहू लागला .

"काय पाहतोस ?माझ्या आईचा फोटो आहें .दिसते ना माझ्यासारखी? आणि या तिच्या खास मैत्रिणी .नर्सिंगला तिघी सोबत होत्या .ही डाव्या बाजूची नॅन्सी मावशीआहे ना हिने आईला खूप मदत केली होती म्हणे . माझ्या आईला डॉक्टर राजनने धोका दिला त्याकाळात नॅन्सी मावशीने खूप मदत केली .खूप सावरलं आईला ".

मानसी ,सौरभला नॅन्सी मावशीबद्दल खूप भरभरून बोलत होती पण सौरभाचे लक्षच नव्हते .

तेवढ्यात मानसीची आई खाण्याच्या प्लेट्स घेऊन आली .

काकू या फोटोतील तुमच्या मैत्रिणी तुमच्यासोबत नर्सिंगला होत्या का ?

हो ...तू का विचारतोस ?ही डाव्या बाजूची पण नर्स होती ?म्हणजे नर्सिंग शिकत होती ?

हो ?तुला का आश्चर्य वाटतं ?

"काही नाही ..खूप ओळखीची वाटते "

खाणं पिणं आटोपून सौरभ जायला निघाला .मानसीला पुन्हा भेटण्याचं आश्वासन दिलं.लवकरच आपल्या लग्नाची बोलणी करायला आईबाबांना घेऊन येतो अस आश्वासन देऊन घराबाहेर पडला .

राहून राहून त्याला डॉक्टर राजनचा राग येत होता आणि फोटोतील नॅन्सी एक नर्स आहे याचे आश्चर्य वाटत होते .

मनातून आनंदही झाला चला फोटोतील नॅन्सी नर्स आहे म्हणजे आपलं काम सोपं झालं .आता आपलं आणि मानसीचं लग्न होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही .

क्रमशः

©अर्चना अनंत धवड


Comments