दोन किनारे (भाग -2)

2

मानसी जेवायला ये . डायनिंग टेबल वर जेवायला बसलेल्या मानसीच्या आईने तिला आवाज दिला .

मानसी जेवायला बसली खरी पण तिला जेवणच जात नव्हते .थोडंस खाऊन ती बेडरूममध्ये गेली .

मानसीची आई सर्व आवरून,दुधाचा ग्लास घेऊन  तिच्या बेडरूममध्ये आली.

"मानसी ...काय झालं ? न जेवताच उठली ..तिच्या केसांवरून हात फेरीत आई म्हणाली .

"हे घे दूध पी ...

"नकोय मला ..उठून बसत मानसी म्हणाली ".

"तुला माझा राग येतोय का? अग पण मी तुझ्या भल्यासाठीच म्हणते बेटा .हे बघ लग्न नेहमी बरोबरीतच व्हायला हवे "

"आई ,पण सौरभ ला काही प्रॉब्लेम नाही ...त्याच्या आईबाबांना काही प्रॉब्लेम नाही तर तुला का असावा ? आई मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही ...नाही जगू शकत त्याच्याशिवाय म्हणून आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागली ".

"मी तुला रडू नकोस म्हणणार नाही ...रडून घे ..पूर्ण आयुष्य माझ्यासारखे राडण्यापेक्षा आताच रडून घे "

रडता रडता मानसी शांत झाली .

"काय म्हणतेस आई?मला कळलं नाही ".

"हे बघ बेटा लग्न नेहमी बरोबरीत व्हावे...मी तुला सांगितलं की तुझे बाबा तू जन्माच्या आधीच मरण पावले परंतु हे खरं नाही .मी तुला कधी सांगितलं नाही तूझा बाप एक डॉक्टर होता ...नाही आहे . त्या माणसाने मला धोका दिला ."

आई काय बोलतेस तू?तू कधी मला अस काही बोलली नाहीस ...

ज्या माणसाला मी माझ्या आयुष्यातून वजा केलं ...तो माणूस जिवंत काय आणि मेलेला काय सारखच..मी ही गोष्ट तुला कधी सांगणार नव्हती .पण आज ती वेळ आली .

अग,मी एका मोठया सरकारी हॉस्पिटल मध्ये नर्स होती. डॉक्टर राजन नवीनच दवाखाण्यात रुजू झाला होता.  त्याचं व्यक्तिमत्व इतकं आकर्षक होतं की कुणीही त्यांच्या प्रेमात पडावं .पाहताक्षणी मला तो  आवडला होता पण तो एक  एक डॉक्टर होता  आणि मी नर्स त्यामुळे मीआपली पायरी ओळखून होते .

"जनरली आमची ड्युटी एकाच शिफ्ट मध्ये असायची ..त्यामुळे आमच्यात मोकळेपणा आला होता .हळूहळू आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो .मला भीती वाटायची की खरंच एक डॉक्टर एक नर्सवर प्रेम करू शकतो ? पण बरेचदा त्यांच्या प्रेमाची प्रचिती यायची ...
मी स्वतःला खूप नशीबवान समजायचे ..."

आता आमचं बाहेर फिरणं सुरू झालं होतं. हॉस्पिटलमध्ये पण सगळ्यांना कुणकुण लागली होती . तो जवळच एक फ्लॅट घेऊन एकटाच  राहायचा . एकदा तो हॉस्पिटलला आला नाही  .मला फार बेचैन वाटत होतं .त्यांच्या सहकाऱ्याकडून कडून कळलं की त्याची  तब्बेत ठीक नाही ...मला राहवलं नाही .मी लंचटाइम मध्येव भेटायला गेले ..तो झोपला होता  ..गोळ्या घेतल्याने ताप उतरला होता .चेहरा थोडा मलून दिसत होता .मी  त्याला करुन चहा दिला ..आता त्याला बरं वाटत होत .तो  म्हणाला थोडं डोकं दुखतं ती बामची बाटली दे .मी स्वतः त्यांना बाम लावून देत होते ..अचानक त्यानी माझा हात हातात घेतला आणि मला स्वतःकडे ओढून घेतलं ...जे काही घडतंय हे चुकीचं घडतंय हे माहिती असूनही मी विरोध करू शकले नाही ..कारण मी त्यांच्या प्रेमात होते .

मला फार अपराध्यासारखं वाटत होतं ..पण तो म्हणाला ,अग चुकीचं काय आहे त्यात ...जे काही झालं ते दोघांच्या इच्छेने झाले ...आपलं प्रेम आहे एकमेकांवर .मलाही थोडं पटलं.

आणि निसर्गाचा चमत्कार झाला ...मला दिवस गेले ...

मी त्या दिवशी परत त्याच्या रूमवर गेले .त्यानी मला मिठीत घेतले ...
मी मिठी सोडवत म्हटले...आपण लग्न कधी करायचे ?

"अग ,करू की ..घाई काय आहे ...आणखी जवळ घेत तो म्हणाला .
नाही ,आपल्याला लवकर लग्न करावं लागेल ..मी तुझ्या बाळाची आई होणार आहे ".

काय ?त्यांनी चक्क मला धकललेच.

"अग,काय बोलतेस ?गर्भपात कर ..मी तुला गोळ्या देतो".

"अरे पण आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे  हे बाळ ".

"ये बाई,हे सिनेमातील डायलॉग बंद कर .माझं लग्न जुळलं आहे डॉक्टर मुलीशी ...आमची एंगेजमेंट झाली आहे ".

आणि आपलं प्रेम?

"तू त्याला प्रेम म्हणते ..ती शारीरिक भूक होती तुझी आणि माझीही ...हे बघ ,मी बळजबरी केली नाही .जे काही झालं तुझ्या संमतीने झाले आणि एक लक्षात ठेव तू माझ्या रूमवर आली होती मी तुझ्याकडे नाही ".

माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली .मी रडत म्हंटल,अरे पण आपलं प्रेम ?

"मूर्ख आहेस का तू?प्रेम तुझं आणि माझं ?कसं शक्य आहे ?
मी एक डॉक्टर ,आणि तू एक नर्स ...माणसानं आपली लायकी ओळखावी .तुमच्यासारख्या मुली श्रीमंत मुलाला आपल्या जाळ्यात ओढता आणि त्याचा गैरफायदा घेता .काय गॅरंटी तुझ्या पोटातील बाळ माझंच आहे ".

राजन ...मी जोरात ओरडली .

माझ्यासमोर पैशाचे बंडल फेकत म्हणाला ,"हे घे ,आणि तुझ्या पोटातील ते पाप मिटवून टाक "

मी म्हणाले,"तू जरी प्रेम केले नसलेस तरी माझं प्रेम होतं  तुझ्यावर ..आणि माझ्या बाळाला जन्म देणारच आणि तुझं नावही लावणार ..हे पैसे ठेव तुझ्याजवळ ".

मी तिथून निघून आले कधीही परत न जाण्यासाठी .

'आईवडिलांनी गर्भपातासाठी खूप दबाव आणला पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते.शेवटी त्यांनी माझ्याशी संबंध तोडले.
मी माझी बदली दिल्लीला करून घेतली . तिथे मला कुणीही ओळखत नव्हते .मी माझी ओळख राजन देशमुख ची विधवा अशीच दाखविली.जो एक सामान्य नोकरी करणारा माणूस होता ज्याचा लग्नानंतर एका महिन्यात मृत्यू झाला होता आणि तुझी ओळख मानसी  राजन देशमुख अशी झाली .

एकेरी पालकत्व निभावताना अनेक अडचणी आल्या परंतु मी तुला त्याची झळ पोहचू दिली नाही. म्हणून मी म्हणते लग्न नेहमी बरोबरीत करावे .तु डॉक्टर व्हावं अस वाटायचं पण तुला मार्क्स कमी पडले आणि तुला दुसरं काही कर म्हटलं तर तू नर्सिंग करण्यावर ठाम होती .तू व्यवसाय जरी माझा निवडला असला तरी तुझं जीवन मला माझ्यासारखे होऊ द्यायचे नाही .आता कळलं ..मी का विरोध करते ?

'आई ,तुझं सगळं खरं पण सगळी माणसं सारखी नसतात .सौरभ तसा नाही .त्याचं खरंच प्रेम आहे माझ्यावर ..प्लीज आई एकदा तू त्याला भेट .नंतर तू ठरवशील ते मान्य असेल मला ".

"ठीक आहे ,तू म्हणतेस तर मी भेटेन एकदा .परंतु मला काही चुकीचे वाटले तर तुला त्याला विसरावे लागेल ".

आईच्या गळ्यात पडून मानसी म्हणाली,"हो आई तू म्हणशील तसं ".

आई एक विचारू ?डॉक्टर राजन देशमुख कुठे आहेत आता?कुतुहलाने मानसीने विचारले.

"तुला त्यांना भेटायचं आहे ?ज्यांनी तुझं अस्तित्वच नाकारलं अशा माणसाला भेटायचं आहे ?"

"नाही आई ...अजिबात नाही ...माझे बाबा माझ्या जन्मापूर्वीच मरण पावले ".

चल दूध पी आणि झोप . उद्या पाच वाचता बोलावं सौरभ ला अस सांगून आई रूमच्या बाहेर आली.

सौरभला मेसेज करून पाच वाजता येण्याची आठवण करून दिली आणि मानसी सौरभच्या विचारत झोपी गेली.

क्रमशः

©अर्चना अनंत धवड

Comments