दोन किनारे (भाग -1)
दोन किनारे भाग-१
सौरभ कॅफे मध्ये मानसीची वाट पाहत बसला होता...सायंकाळी साडे सात ला भेटू असं ठरलेलं... आठ वाजत आहे अजून कशी आली नाही? मनाशीच विचार करीत दहादा हातातील घडाळ्याकडे पाहत होता. वेटर दोन दा विचारून गेला ऑर्डरबद्दल.. फोन लावला तर फोन पण उचलत नव्हती...एकदा फोन करून बघावा म्हणून फोन काढला तितक्यात लांबून मानसी येताना दिसली .
मुळातच सुंदर असलेली मानसी ,निळ्या रंगाच्या स्लीवलेस शॉर्ट वनपीस ड्रेस मध्ये अधिकच खुलून दिसत होती .तिचा रेखीव चेहरा ,उंच बांधा आणि त्याला साजेसे ड्रेसिंग सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते .सौरभने मुद्दाम कोपऱ्यातील टेबल घेतला होता जेणेकरून थोडा एकांत लाभेल ..टेबलपर्यंत येईपर्यंत सगळ्यांनी एकदातरी तिच्याकडे वळून बघितलं .
"सॉरी ...वेळ झाला "अस म्हणत ती त्याच्या समोरच्या खुर्चीत बसली .
सौरभ ने तिच्या चेहऱ्याकडे बघितलं ...खूप सुंदर दिसत होती परंतु चेहरा किंचितसा ओढल्यासारखा दिसत होता ..कुठेतरी दुःखाची छटा दिसत होती .
"इट्स ओके डिअर!काय घेतेस मग ,वेटर दोन दा येऊन गेला ".
"काही नको,कॉफी घेऊ फक्त"
"अग,काहीतरी घेऊ या ना "
"नको,आई स्वयंपाक करेल घरी .तिला सांगितलं मी घरीच जेवेल म्हणून .तू घे तुझ्यासाठी काहीतरी ".
"हो,मला भूक लागलीय ..सँडविच घेतो ..तू पण खाशील थोडं "
एक सँडविच आणि दोन कॉफी ची ऑर्डर देतो .
मानसी त्याला कुठेतरी हरवल्यासारखी वाटते.
"मानसी काय झालं ?अशी का दिसतेस ?"
अरे कुठे काय ?काही नाही ...
"मानसी मी तुला तीन वर्षांपासून ओळखतो ... तुझा चेहरा सांगतोय काहीतरी टेन्शन आहे ...बोल ना " तिचा हात हातात घेत सौरभ म्हणाला.
मानसी खाली घालून बसली ...काहीही बोलली नाही.
तिचा हात हलकेच दाबत सौरभ म्हणाला "काय झालं मानसी ,अग मी परवा निघतोय माझ्या गावाला ..तू असा निरोप देणार ?
मी माझ्या आईबाबांसोबत बोलणार आपल्या नात्यासंबंधात...लवकरच तुला मागणी घालायला येईल मी "
सौरभला त्याचा हात ओला झाल्याचं लक्षात आलं ..त्याने मानसीच्या चेहऱ्याकडे पाहिलं .तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ...
"मानसी ,तू बोलली नाही तर मला कस कळेल ?काय झालं ?का राडतेस ?मी चाललो म्हणून ?वेडी की काय ?अग ,फोनवर बोलूच आपण आणि तसही काही काम राहिलंय माझं .पुढच्या महिन्यात येणारच आहे मी कॉलेजला .अग आता फक्त परीक्षा झाली .मधून मधून यावच लागेल .तेव्हा भेट होईलच ".
तोपर्यंत ऑर्डर आली .मानसीने डोळे पुसले .सौरभने तिला जबरदस्तीने थोडं सँडविच खायला लावलं आणि दोघेही कॉफी घेऊ लागले .
आता थोडी मानसी रिलॅक्स झाली होती ..ती शब्दाची जुळवाजुळव करीत अडखळत बोलू लागली .
"सौरभ,आपलं लग्न होऊ शकत नाही .माझी आई तयारच नाही आपल्या लग्नाला .अरे,म्हणून तर मला उशीर झाला आज यायला .मी तिला खूप समजावलं पण ती तयारच नाही.तिने मला ठाम सांगितलं की हे लग्न होऊ शकत नाही .तुला तर माहितीच आहे माझी आई माझं सर्वस्व आहे ...तिच्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन मी लग्न करू शकत नाही .आपण एकमेकांना विसरलेले बरं ".
"वेडी आहेस तू ?आपलं तीन वर्षाचं प्रेम तू मला विसरायला सांगतेस ?"
"अरे मला कळतंय रे .ते इतकं सोपं नाही .मी तर तुझ्याशिवाय जीवनाची कल्पनाच करू शकत नाही .परंतु मी आईच्या इच्छेविरुद्ध वागूही शकत नाही .अरे बाबांना तर मी पाहिलेही नाही.आईने मला लहानाचे मोठे केले .मी माझ्या आईचं विश्व आहे ..तिला दुखावून मी सुखी नाही होऊ शकत ".
"अग,पण का ?काय कमी आहे माझ्यात ?मी एक डॉक्टर आहे .मुंबईत माझं मोठं स्वतःच हॉस्पिटल आहे .आईवडील डॉक्टर आहे ...अजून काय हवंय तुझ्या आईला ?"
"तेच नको माझ्या आईला ..तू एमडी मेडिसिन आणि मी एक नर्स ..आई नको म्हणते ...नाकापेक्षा मोती जड नको अस आई म्हणते .दोन किनारे कधी एक होऊ शकत नाही अस आई म्हणते ".
अग,पण मला,माझ्या आईबाबांना काही प्रॉब्लेम नसताना तुझ्या आईला का असावा ?
"तू सांगितलं कधी तुझ्या आईबाबांना ?"
"नाही,अजून बोललो नाही .परंतु मला विश्वास आहे .माझेआईबाबा माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतात .मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचं पूर्ण स्वतंत्र आहे .त्यामुळे विरोध करण्याचा प्रश्नच नाही".
"ठीक आहे पण माझ्या आईचं काय ? अरे तिला लाख समजावलं ...पण ती तयारच नाही "
"मानसी तू काही काळजी करू नकोस .मी भेटेन तुझ्या आईला ..वेळ पडल्यास माझ्या आईबाबांना पाठविल समजूत घालायला ...माझ्या सुखासाठी माझे आईवडील काहीही करू शकतात "
मानसीला खूप आनंद झाला .सगळं ठीक होईल ना रे ?"डोळ्यात अश्रू आणून मानसी म्हणाली .
"अजिबात काळजी करू नकोस ...मी आहे ना ..माझ्यावर विश्वास ठेव ..मी उद्या भेटतो तुझ्या आईला ..एवढया हँडसम जावई कसा नाकारते ते बघतोच मी ?"सौरभ तिला चिडवत म्हणाला.
मानसीच्या मनावरील दडपण काही अंशी कमी झालं होतं .
दोघेही हातात हात घालून तिथून बाहेर आहे ...
"अग ,तू कशी आलीस "बाहेर निघताच सौरभ म्हणाला .
"मी कॅब ने आले ..कॅब बुक करते आता "
"नको,खूप वेळ झाला आता .मी सोडतो तुला .
मानसी त्याच्या बाईकवर त्याच्या मागे त्याला घट्ट पकडून ,त्याच्या पाठीवर डोकं ठेवून बसली .उद्या काय होईल ते होईल पण हे क्षण तिला मनात साठवून घ्यायचे होते .हा प्रवास संपूच नये अस वाटत होत तिला ..अचानक गाडी थांबतातच भानावर आली .
"मानसी,उद्या पाच वाजता येतो मी तुझ्या आईला भेटायला "तिचा हात थोपटत सौरभ म्हणाला .
"ठीक आहे,मी सांगते तसं आईला ..काही अडचण असल्यास तुला फोन करते...चल बाय ..गुडनाईट "
बाय करून सौरभ गाडीला किक मारून निघून गेला .
जाणाऱ्या गाडीला पाहत जड पावलाने मानसी घराकडे वळली .
क्रमशः
Comments
Post a Comment